Tuesday, December 14, 2010

लग्न

१२ डिसेंबर २००८. फारस काही घडल नाही या दिवशी, पण मी 'उच्चशिक्षित' झालो.कसा झालो याची चर्चा करण्यात फारसा अर्थ नाही.मातापितरांच्या अपेक्षेपेक्षा खुपच शिकलो म्हणुन त्यांना आनंदाच भरत आलं.पण शाळेमधे 'पास' आणी 'नापास' यामधली 'वर घातला' ही एक स्थिती असते, तस काहीस feeling होत. ( माझ्या मते 'वर घातला' यासारखा दुसरा संतापजनक प्रकार नसेल.एक तर सन्मानानी पास तरी करा नाहीतर अपमानानी नापास तरी करा ! पण ' वर घातला' म्हणजे " आपण लावलेले दिवे बघता खर तर शाळेच्या दारात उभ रहायचीही आपली लायकी नाही...पण आपल्या आईबापांवर उपकार म्हणुन वर ढकलत आहोत.." ही मिठाची चोळणी फार वाईट.) त्यातच दैवयोगानी 'उच्चशिक्षित बेकार' होण्याची वेळ न येता एका company नी पोटापाण्याची सोय केली होती. त्यामुळे थोड्याच दिवसात मला आजुबाजुंनी 'लग्न...लग्न..कधी...विचार...." असले शब्द ऐकु येऊ लागले. कुठलीही जबाबदारी आणी खर्च नसल्यानी मी खाऊनपिऊन सुखात होतो. त्यामुळे हे भलतं लचांड मागे लचांड मागे लाऊन घ्यायची अजिबात इच्छा नव्हती. मी सोयिस्करपणे दुर्लक्ष करत होतो.त्यातुन आमच्या मित्रांच्या group मधल्या आठ पैकी तिघांच लग्न झालेल असल्यामुळे ते अनुभव गाठीला होते. आता खर तर या तिन्ही लग्नांवर स्वतंत्र लेखमाला प्रसिध्द करता येईल. पण स्थळकाळाच भान ठेऊन 'थोडक्यात आणी महत्वाच' सांगतो. ( ही तिन्ही लग्न 'ताजी' असल्यामुळे नावं घेण्यात अर्थ नाही...)

यातला सगळ्यात जुना खेळाडु म्हणजे आमचा MBBS डॉक्टर. लहानपणापासुनच डॉक्टर व्हायच याच स्वप्न होत. पण आता मागे वळुन बघता अस लक्षात येत की त्याबरोबर जास्तीजास्त लफडी करण हेही याच ध्येय असाव. कारण आपल्या 'inning' ची सुरवात याने शाळेपसुनच केली. शाळा, ज्युनियर कॉलेज अशी मैदान गाजवत नंतर यानी medical college मधे 'चौकार षटकारांची' आताषबाजी केली.शेवटी एका station वर याची गाडी थांबली. अनेक 'अडीअडचणीं'वर मात करुन, 'प्रतिस्पर्धां'ना नामोहरम करत शेवटी यानी शर्यत जिंकली ! ( अस सांगतात की एकदा एका ट्रेकला गेला असताना हा girlfriend शी बोलायला range मिळते का ते बघण्यसाठी मोबाईल उंच हातात धरुन त्या दर्‍याखोर्‍यात भटकत होत...). पण लग्नाआधी बोलावताक्षणी कट्ट्यावर हजर होणारा हा, आता फोन केल्यावर दबक्या आवाजात "अरे नको..आज जमणार नाही' हे एकच वाक्य कसबस बोलुन फोन खाली ठेवतो.एक पान खाण्यासाठीही बायकोकडुन परवानगी काढावी लागते अस म्हणतात. (दारुसाठी तर घरात एक आठवडा स्वयंपाक आणी धुणीभांडी करावी लागतात अस बोलल जात..) चुकुन बाहेर पडलाच तर "येताना हॉलमधे ठेवायला फुलांचा गुच्छ घेऊन ये..." असले फोन येतात आणी टपरी वरच्या अण्णाला फुलचंद लावायची order द्यायची सवय असलेल्या तोंडानी हा फुलवाल्याला फुलांची order देतो.त्यामुळे बायको माहेरी बाहेरगावी गेली की हा पुण्यात उधळलेल्या सांडासारखा मोकाट भटकत असतो.
दुसरा BAMS डॉक्टर. याच्या आधीच्या २१ पिढ्या शुक्रवार पेठेत गेल्या आणी पुढचा २१ जाण्याचीही दाट शक्यता आहे.BAMS झाल्यावर पुणेरी परंपरेला स्मरुन याने ९:३० ते १२ clinic , १२ ते १ जेवण, १ ते ४ वामकुक्षी आणी संध्याकाळी कट्टा अस धंदा सुरु केला. पहिल्यापासुनच मुलींच्या बाबतीत स्वतःला कार्तिकेयाचा अवतार समजुन लफड्यांमधे कार्यरत असणार्‍या आमच्या इतर मित्रांना उपदेशाचे डोस पाजणे, येता जाता घालुन पाडुन बोलणे, 'गेला असेल duty वर' अशी जहरी टीका करणे असले पेठी धंदे केले. त्यामुळे याच लफड बाहेर आल्यावर, 'याने पोरगी पटवली' यावर आमच्यातल्या एकानीही प्राण गेला तरी विश्वास ठेवला नाही. उलट 'पोरीनी याला पटवला' हेच जहाल सत्य आम्ही स्विकारल आहे. अशा दगडाला प्रेमात पडायला लावणारी ही मुलगी आमच्या मते झाशीची राणी, इंदिरा गांधी इत्यादींच्या पंक्तीला जाऊन बसते आणी तिचा सत्कार करण्यात यावा अशी सुचना मी लवकरच मांडणार आहे. पण लग्नानंतर याची अवस्था दरवेशाकडच्या माकडासारखी झाली आहे.दोन दोन दवाखाने, दुपारची झोप बंद, रात्री ९ च्या आत घरात असे हलाखीचे दिवस आले आहेत. कट्ट्याच नाव काढताच उपाशी रहाव लागत असही कळल आहे.कुत्राचा मालक जसा काही काळ कुत्र्याला पट्टा काढुन मोकळा सोडतो तस याला दिवसा कामासाठी मोकळ सोडल जात. बायकोच माहेरही पुण्यातच असल्यामुळे MBBS डॉक्टरच्या नशिबातल दुर्मिळ स्वातंत्र्यही याच्या नशिबात नाही. हे सगळे त्याने आधी केलेल्या वाचाळपणाचे भोग आहेत अस लोक सांगतात.
तिसरा MBA. (हा MBA आहे असच सगळीकडे माहिती आहे. कारण त्याआधी त्यानी केलेल्या डिग्रीला फारसा अर्थ नाही...).पोरीबाळींच्या मागे शेपुट हलवत हिंडण्याची याची सवयही शाळेच्या दिससांपासुन होती. २१ वय उलटल्यावर हा कुठल्याहीक्षणी लफड जाहीर करुन लग्नाची घोषणा करेल अशी परिस्थिती होती. पण नंतर हा अचानक MBA झाला..MBA झाल्यावर आपल्याला जगातल्या सर्व गोष्टींबद्द्ल सगळ काही कळत अस एक गैरसमज निर्माण होतो हे माहित होत पण माणुसच बदलतो हे पहिल्यांदाच बघत होतो. कारण त्यानंतर त्यानी एकदम नांगी टाकली आणी वधुवरसुचक मंडळात नाव घालणे, पत्रिका बघणे, चहापोहे चरणे असले सोपस्कार करुन लग्न केल. लग्नानंतर १५ मिनिट कोपर्‍यावर जायलाही परवानगी काढावी लागते अस कळल आहे.
तर हे अस सगळ असल्यामुळे 'लग्नाचा काय?' अस थेट प्रश्न आईनी विचारल्यावर विचारत पडलो. बराच विचार करुन 'लग्न का करायच नाही ? ' या प्रश्नाला समाधानकारक उत्तर न सापडल्याने 'चालेल..' अस आईला सांगितल. पडत्या फळाची आज्ञा समजुन ती कामाला लागली. मी हो म्हटल खर पण पुढे काय वाढुन ठेवल आहे याची खरच कल्पना नव्हती.
यानंतर विविध ठिकाणी नाव नोंदवणे, स्थळांची online आणी offline चाळणी करणे वगैरे काम सुरु झाली. एकतर बहुसंख्य profiles ही आईवडिलांनी तयार केलेली असल्यामुळे त्यात दिलेल्या अपेक्षा मुलीच्या आहेत की आईवडिलांच्या हे कळायला मार्ग नसतो. बरीच profiles बघितल्यावर आईवडिलांच्या ( किंवा मुलीच्या ...) मते साधारणपणे " मुलगा शांत, मनमिळऊ, नम्र, आज्ञाधारक, निर्व्यसनी, सरळमार्गी, IT वाला, पगारदार, विश्वासु, social, friendly, humorous, well settled, well educated, smart , simple, confident, positive, independent, fun loving, warm hearted ('hearted' असा शब्दही असतो हेही या निमित्तानी कळल !!) ,caring, intelligent, ambitious, well-cultured, considerate, supportive, articulate, down to earth" असावा अस लक्षात आल ! आता एवढ्या अपेक्षा आमच्या बापानीही कधी आमच्या कडुन ठेवल्या नाहीत. (अर्थात त्यांनी कुठल्याही अपेक्षा ठेवण आमचे पाय पाळण्यात दिसले तेव्हाच सोडुन दिल होत.) एका profile मधे तर मुलगा 'dashing' असला पाहिजे अशी अपेक्षा होती. आता 'dashing' म्हणजे 'किमान रस्त्यावर मारामारी करता आली पहिजे' , 'विमानातुन parachute नी उडी मारण जमल पहिजे, कमितकमी करटे black belt हवा अस अपेक्षित होत का ते महित नाही. एकीच्या आईनी फोनवरच 'आम्हाला hi-fi मुलगा पहिजे' अस सांगुन टाकल ! एकीने आपल्या profile मधे 'I am not Angelina Jolie, so you need not to be Brad Pitt' असा प्रामाणीक कबुलीजबाब दिला होता. एक दोघींनी तर job साठी पाठवला जाणारा resume च लग्नाचा profile म्हणुन पाठवला होता (त्यामधे १० वी पासुनचे marks दिलेले होते. ते बघुन कोण त्यांना response देईल याची मला आजही काळजी लागुन रहिलेली आहे...). हे सोडुन phone/email ला उत्तर न देणे, आपल्याला आवडलेल्या मुलींनी आपल्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवणे आणी न पसंत पडलेल्या मुलींच्या पालकांचे परत परत phone येणे हे नेहेमीचे अनुभव होतेच.
Profile मधले photos हा तर वेगळाच विषय आहे. आपण कसे दिसतो याच फोटो बघणार्‍याला अंदाज यावा, या फोटोच्या मुलभुत उद्दिष्टाशी पुर्णपणे फटकुन काढलेले बरेच फोटो असतात. धुसर, लांबुन काढलेले, खुप वर्षांपुर्वीचे, असले नमुनेदार फोटो बघुन ही मुलगी सध्या कशी दिसत असेल हे डोक्याला बराच ताण देऊन imagine कराव लागत होत. काही जणींनी तर group फोटो लाऊन यावरही कडी केली होती. आता फोटोमधे उभ्या असलेल्या चार जणींपैकी लग्नाला नेमकी कोण उभी आहे हे बघताक्षणी ओळाखण्याइतकी 'तयार' नजर माझी नाही. अश्याच एका profile वर दोन मुलींचे गळ्यात गळे घातलेला फोटो बघितल्यावर वैतागुन अधिक चौकशी केली तर त्यातली जरा बरी दिसणारी मुलगी लग्नाळु मुलीची मैत्रिण निघाली. त्यावर 'मग मैत्रिणिचा contact number मिळु शकेल का?' हा प्रश्न मी जिभेच्या टोकावरुन मगे ढकलला.
या सगळ्यातुन प्रत्यक्ष मुलीपर्यंत पोचण्यासाठी जे अडचणींचे डोंगर पार करावे लागतात त्यातला पत्रिका हा सगळ्यात मोठा डोंगर. त्यातुन मी पडलो कट्टर नास्तिक. पत्रिका, भविष्य, ज्योतिष सोडुनच द्या पण देवही न मानणारा. या आधी कधीही पत्रिकेच्या वाटेला गेलो नव्हतो व नंतरही जाणार नाही हे ठरलेल असल्यामुळे आईबाबांना 'तुम्ही या पत्रिकेच्या भानगडीत पडु नका, ज्यांना बघायची असेल त्यांना बघु द्या' अस सांगितल.पण हे पत्रिकेच थोतांड हल्ली फारच वाढल आहे हे लक्षात आल. यापुर्वी कधिही पत्रिकेच्या वाटेला न जाणारी लोक लग्न म्हटल की पत्रिका बाहेर काढतात. लोक चोर-दरोडेखोरांना घाबरत नसतील इतके पत्रिकेला घाबरतात.त्यामुळे पत्रिका बघणार्‍या कुडमुड्या ज्योतिषांच आणी भटजींच चांगलच फावल आहे. एकीकडे नावामागे डिग्रांची रांग लावयची आणी फलज्योतिष्यासरख्या तर्कबाह्य आणी आधारशुन्य गोष्टीवर आपल्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या निर्णयासाठी डोळे झाकुन विसंबुन रहायच. 'शिक्षणानी अंधश्रध्दा कमी होईल आणी या देशाच्या अनेक समस्यांपैकी एकाची तीव्रता थोडी तरी कमी होईल या मझ्या भाबड्या समजुतीला सुरुंग लावणारा हा अनुभव होता. काय गंमत आहे बघा. विश्वाच्या अफाट अफाट पसार्‍यात एक बिंदुहुनही छोटी असलेली आपली पृथ्वी आणी उणपुर शंभर वर्षाचही आयुष्य नसलेल्या त्यावरच्या टीचभर माणसान या अवकाशात धीरगंभीरपणे अनादी काळापासुन फिरत असलेल्या ग्रहगोलांचा आपल्या जीवनावर आणी भविष्यावर परिणाम होतो हे मानण याला टोकाचा अहंकार म्हणाव की मुर्खपणा ? असो.
तर अश्या अनेक अडचणींमधुन मार्ग काढल्यावर प्रत्यक्ष मुलींबरोबर बोलण्यातही छोटीशी अडचण होती. 'पोटासाठी भटकत..' या न्यायानी शिक्षण आणी नोकरीसाठी काही काळासाठी परदेशी वास्तव्य असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा (chatting,email, skype वगैरे) वापर करुन प्रार्थमिक बोलणी करावीत आणी मग प्रत्यक्ष भेटीत निर्णय घ्यावा अस ठरवल.अस बोलण आणी प्रत्यक्ष भेटुन बोलण यात घोडा आणी गाढवाइतक अंतर आहे, पण इलाज नव्हता. पहिलाच अनुभव धक्कादायक होता. याआधी मैत्रिणिंशी chatting करायची सवय होती, पण 'असल' chatting करायची पहिलिच वेळ होती. पहिलीच मुलगी खानदानी वकिल होती.म्हणजे ती, तिचे वडिल, आजोबा सगळेच वकिल.ती या बाबतीत बरीच 'अनुभवी' असावी. कारण 'hi hello' होतं न होतं तोच तिनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. खरं सांगतो, त्यातले अनेक प्रश्न मला गेल्या २६-२७ वर्षात पडले नव्हते. मी विचार करकरुन शब्द जुळवुन उत्तर देत होतो आणी ती माझ्या प्रत्येक उत्तराची उलटतपासणी घेत होती. 'Professional' आणी 'Personal' life ची थोडीशी गल्लत झालेली दिसत होती. लवकरच माझ्या छोट्याश्या मेंदुला हा ताण सहन होईना.शेवटी या रोजच्या प्रश्नोत्तरांना कंटाळुन आणी पुढच सगळ आयुष्य कोर्टाच्या कटघरात उभ राहिल्यासारख काढायची इच्छा नसल्याने मी नम्रपणे नकार कळवला. अजुनही काही बोचणारे अनुभव अधुनमधुन आलेच. "अमेरिकेत रहातोस म्हणजे स्वयंपाक येत असेलच...धुणी भांडी करायची सवय असेलच ..(म्हणजे नंतर कामवाल्या बाईची गरज नाही...) हे ऐकुन घ्यावं लागल. आईला ती बॅंकेत असताना जेवढ काम पडलं नसेल तेवढ या स्थळांची उस्तवारी करताना पडल.
पण मी लवकरच सरावलो. प्रश्नांच्या सरबत्तीचा सामना कसा करायचा, उलटी प्रश्नांची फैर कशी झाडायची, कोणते आणी कश्या पध्दतीने प्रश्न विचारल्यावर नेमकी उत्तर मिळतात हे कळल. पण प्रत्यक्षात भेटल्यावर काय होईल हा suspense होताच.










(सुचनाः हा लेख अर्धवट आहे..याला शेवट नाही असा आरडाओरडा करुन कृपया उगाच दंगा करु नये. ..चाणाक्ष वाचकांनी लेख अर्धवट का सोडला आहे ते ओळखल असेलच !)

Monday, June 14, 2010

मित्र


मागच्या पुण्याच्या भेटीत शाळेच्या भागात जाण्याचा योग आला. अप्पा बळवंत चौकातली ही नावाजलेली जुनी शाळा. यंदाच शाळेच शतकोत्तर अमॄत महोत्सवी वर्ष होत. ह्याच शाळेत माझ शालेय शिक्षण झाल. 'शिक्षण झाल' म्हणण्यापेक्षा मी या 'शाळेत होतो' अस म्हणण जास्त बरोबर ठरेल. 'शाळेत शिक्षण मिळत' यावर शाळेनी कधीही विश्वास बसु दिला नाही. त्यामुळे शाळेतल्या शिक्षकांच्या घरी शिकवणीला जाऊन मी 'सुशिक्षित' झालो.

एकमेकांच्या गळ्यात गळे घालुन वसलेल्या पुणेरी पेठांच्या मध्यवर्ती भागात आमची शाळा असल्यामुळे तिथे येण्यार्या अठरापगड जातीच्या विद्यार्थ्यांना एक विशिष्ट 'character' होत. त्यातुन पापभिरु, मध्यमवर्गीय घरातुन आल्यामुळे आणी अभ्यासात थोडीफार गती असल्यामुळे सगळ शालेय जीवन A ते F या उतरंडीतल्या A-B वर्गात गेल. त्यामुळे जे मित्र भेटले तेही 'खानदानी पेठी'. पुढे यथावकाश जिवाच्या करारानी १० वी पास झालो.त्यानंतर अनेक मित्रांच्या वाटा वेगळ्या झाल्या. पण माज, खत्रुडपणा, एकमेकांची उणीदुणी काढत कुचाळक्या करणे अश्या समान गुणांमुळे सहा सात महाभागांची संगत सुटली नाही. नंतर दिवस गेले. (म्हणजे काळ उलटला...). पदव्या मिळाल्या. लोकांच्या आवडीनिवडी, खाण्या'पिण्याच्या' सवयी, बसण्याच्या जागा बदलल्या.कॉलेजात असताना जे खुप काही 'कर्तुत्व' दाखवतील अस वाटल होत त्यांनी काहीच केल नाही. जे काहीच करण शक्य नाही अस वाटत होत त्यांनी खुप 'कर्तुत्व' दाखवल. आतापर्यंतच्याया या वाटचालीत सांगण्यासारख्या खुप घटना आहेत. पण लिहिण्यासारखी एकच !!. पुढची कथा सांगण्यापुर्वी कथेतील पात्रांची थोडी तोंडओळख गरजेची आहे.
आमच्या group मधे मी धरुन एकंदरीत ८ लोक. दीड doctor ( 1 MBBS आणी 1 BAMS आयुर्वेद यांची बेरीज २ न होता दीड होते अस आमच मत आहे.), २ चुकार MBA, 3 दीनवाणे engineer आणी एक भाssऊss...भाऊ म्हणजे... पुण्यात भाऊ असतो.तसला भाऊ.या भाऊ लोकांच्या काही खास 'chaaractoristics' असतात.ही लोक नेहेमी धंदा करतात. नोकरी सारख्या अपमानास्पद गोष्टीची यांना चीड असते.हा धंदा कुठलाही असु शकतो. गोडतेल विकण्याच्या agency पासुन ते foreign exchange पर्यंत काहीही. यांच्याकडे सदैव काही ना काही 'schemes' असतात - अगदी कमी bill येणार्या Tata च्या फोन पासुन ते अर्ध्या किंमतितल्या flat पर्यंत. ह्यांच्या सगळीकडे ओळखी असतात. फाटलेल्या चड्डीला ठिगळ लावण्यापासुन ते पोलिसानी उचलेली गाडी सोडवण्या पर्यंत सगळीकडे ह्यांची 'माणस' असतात. तर असा 'original' भाऊ आमच्याकडे आहे. याचा jim आणी swimming pool maintenance चा धंदा आहे. BAMS doctor हा पारंपारीक वैद्यांच्या खानदानातला, सकाळी थोडी practice, दुपारी झोप, संध्याकाळी जमल तर दवाखाना आणी रात्री तोंडाची गटारगंगा मोकळी करायला कट्ट्यावर वारी असा पुणेरी धंदा करणारा वैद्य आहे. MMBS doctor च्या जीवनावर वेगळ पुस्तक लिहाव लागेल. B.J.Medical सारख्या college ला admission मिळाल्यावर तिथे सर्व 'उद्योग', 'धंदे' , नाटक-तमाशे, करुन फावल्या वेळात doctor की शिकलेल हा doctor आहे. नुकतच याच लग्न झाल. या लग्नाच्या 'inception to implementation' या प्रवासाच्या चित्तरकथेची तुलना फक्त राखी सांवतच्या TV वरच्या स्वयंवराशीच होऊ शकेल. पण आपण जस गेलेल्या माणसांविषयी वाईट बोलत नाही तस लग्न झालेल्या मित्रांच्या पुर्वायुष्याविषयी न बोलण्याचा आमच्याकडे अलिखित नियम आहे. आमच्याकडे एक ' मोठा माणुस' ही आहे. हा college च्या पहिल्या वर्षाला घरातुन पळुन गेला होता. सगळी मोठी माणस लहानपणी घरातुन पळुन जातात. ( हे यानीच आम्हाला नंतर सांगितल...). पण याच्या मते हा घरातुन 'पळुन' नाही तर 'निघुन' गेला होता. आता ही दोन क्रियापद वेगळी असली तरी क्रिया एकच आहे अशी तोपर्यंत आमची असमजुत होती. पण 'मोठ्या माणस' निघुन जात असावीत आणी फुटकळ छोटी माणस पळुन जात असावीत असा काहीसा फरक असावा अशी आम्हाला शंका आहे. ही प्रमुख पात्र सोडता बाकीची लोक माझ्यासारखी सरळ आणी सज्जन आहेत.
Group च्या भेटण्याच्या जागांमधे झालेले बदलही लक्षणीय आहेत. बालगंधर्व पुल, गंधर्व हॉटेल, शारदा center समोरच दक्षिणी, z bridge खालची चौपाटी, S.P. college समोरची chinese ची टपरी, हॉटेल विश्व असे बदल होत गेले.हे होता होता काळ बदलला. CCD नामक ४०-५० रुपायांन भिकार coffee विकणार्या जागा पुण्यात कुत्राच्या छ्त्र्यांसारख्या उगवल्या. आता या सगळ्याची नेमकी सुरवात कशि आणी कुठे झाली माहित नाही. हल्ली पुण्यात शिल्लक राहिलेल्या या ८ पैकी ५ तिरकस डोक्यातल्या नेमक्या कोणत्या डोक्यात कल्पना आली हे सांगण कठीण आहे. पण काही अनाकलनीय कारणांमुळे या लोकांना CCD मधे बसुन 'UNO' नामक लहान मुलांचा पत्त्यांसारखा खेळ खेळण्याची आवड निर्माण झाली.भाऊची jim असलेल्या building च्या बाहेरच CCD झाल होत. त्यामुळे 'भाssऊss..आपलच आहे...' या आपलेपणाच्या भावनेतुन लोक तिथे बसुन UNO खेळु लागली. अधुन मधुन coffee घेत असल्यामुळे CCD वाल्याचीही काही हरकत नव्हती. आणी शेवटी काही झाल तरी तो भाऊ चा माणुस होता.
असाच एक दिवस संध्याकाळी खेळ रंगात आला होता. लोकांना वेळाकाळाच भान राहिल नव्हत. शब्दाशब्दी, बाचाबाची अस सगळ यथासांग सुरु होत. बर्याच वेळानी MBBS doctor नी घरी जाण्याचा निर्णय जाहीर केला. बाकीच्यानी एकच डाव खेळण्याचा त्याला खुप आग्रह केला. पण लहानपणापसुनच हुशार असल्यामुळे, 'कुठे थांबायच' हे कळत असल्यामुळे, तो आग्रहाला बळी न पडता निघुन गेला. बाकीच्या जनतेनी 'शेवटच्या डावाला' सुरवात केली. नेहेमी प्रमाणे आरडाओरडा, शाब्दिक चकमकी यांना उत आला होता. या सगळया गोंधळात एक माणुस शेजारी उभा राहुन लक्षपुर्वक खेळ बघतो आहे हे कोणाच्याच ध्यानात आल नाही. थोड्या वेळानी त्यानी विचारल, " हे काय चाललय ?" कोणीतरी अभिमानानी उत्तर दिल, "UNO खेळतोय !." २ मिनिट विचार करुन रस्त्याकडे हात दाखवत तो चढ्या आवाजात म्हणाला, "चला...."."ओ ..काय झाल ? काय problem आहे..." असले शब्द बाहेर पडायच्या आत कोणाच तरी लक्ष रस्त्यावरच्या तो दाखवत असलेल्या गाडीकडे गेल. ती पांढरी जीप होती. वर लाल बत्ती होती आणी 'पोलीस' अस लिहिलेल होत.थिजलेल्या डोक्यानी आणी जड पायांनी आजुबाजुच्या गर्दी समोर सगळे 'खेळाडु' जीप मधे बसले. जीप सुरु झाली आणी आतल्या हवालदारानी प्रश्न विचारायला सुरुवत केली. वानगीदाखल एक संवाद खाली देत आहे,

"चांगल्या घरातली मुल दिसताय तुम्ही...आणी हे काय लावलय जुगार वगैरे ?.."
"अहो तो जुगार नाही हो..."
"मग काय हाय ?"
"UNO आहे.."
"काये ??"
"UNO...ते पत्त्यासारख असत ..एक्क , दुर्रि, तिर्रि वगैरे...राजा गुलामाच्या ऐवजी ही दुसरी पान असतात..."
"हां...म्हन्जी पत्तेच झाल की...जुगारच..."
"अहो नाही हो..खरच जुगार नव्हतो खेळत..."
"नाव काय ?"
"जोशी"
"कुठ रहातो ?"
"शनिवार पेठ"
"वडिल काय करतात ?"
"मोठ्या company मधे manager आहेत.."
"म्हन्जे सगळच जमुन आलय की राव !!.."
"अहो खरच जुगार नव्ह्तो खेळत ...साधा पत्त्यासारखा खेळ आहे.."
"चांगल्या घरातली मुल तुम्ही...कमवणारी...घरी बसायच संध्याकाळच ते सोडुन हे कसले धंदे करता..आमच्याकडे तक्रार आलीय आजुबाजुच्या लोकांची की रोज इथे जुगार चालतो म्हणुन.."

आता खर म्हणजे हेही एक आश्चर्य होत. नागरिकांनी पोलिसांना फोन करण...पोलिसांनी त्याची दखल घेण...पोलिस घटनास्थळी पोहोचण...तिही घटना घडत असताना आणी 'संशयितांना' 'मुद्देमालासकट' ताब्यात घेण.हे सगळच अविश्वसनीय होत. पण हे सगळ घडल होत. शेवटी मार्केटयार्डाच्या मागच्या भागात जीप थांबली. पोलिस जातीवर उतरला. "बोला ...काय करायच आता ?"हा अस्सल पोलिसी प्रश्न ऐकुन भाऊंला धीर आल. यासारख्या काही प्रसंगांचा त्याला अनुभव होता. मागे एकदा गोवा trip हुन परत येताना महाराष्ट्र सीमेवर विनाकारण गाडी अडवण्यात आली असताना 'direct CID मधल्या ' माणसाला फोन लावुन त्यानी गाडी सोडवली होती. त्यामुळे pant सावरत तोंडावरुन हात फिरवत पुढे होऊन त्यानी सुरवात केली.."जाऊ द्या ना साहेब..सोडुन द्या...जुगार नव्हतो खेळत...परत नही खेळणार...ते हे आपल्या ओळखीचे आहेत.." शेवटी हो नाही करता करता काही रकमेवर मांडवली झाली. रोख रक्कम वसुल करुन पोलिसांनी 'खेळाडुंना' मार्केटयार्डाच्या मागच्या गल्लीत सोडुन दिल. आपल्या गाड्या तिथुन खुप लांब असल्यामुळे आधी फरार झालेल्या MBBS doctor ला फोन लावला.तो car घेऊन आला. सगळ्यांना गाड्यांपाशी सोडल आणी मध्यरात्रीनंतर या नाटकाची सांगता झाली.
या घटनेनंतर हल्ली लोक fergusson college समोरच्या अंधार्या 'सवेरा' मधे चोरुन भेटतात आणी CCD, UNO, पत्ते, असे शब्द कानावर पडले की, 'त्या रात्री त्या पोलिसानी खरच 'आत' घेतल असत आणी तिर्थरुपांना जुगाराच्या आरोपाखाली आत गेलेल्या आपल्या मुलाला सोडवायला याव लागल असत तर काय महाभारत झाल असत' या विचारानी दोन मिनिट शांतता पसरते.

Sunday, June 6, 2010

काहीबाही

आज थोड नॉस्टॅल्जिक झाल्यासारख होतय. अस होत कधी कधी. एखाद जुन पुस्तक परत हातात घेतल जात, internet वर भटकताना एखाद गाण लागत, कवितेची ओळ सापडते, बातमी उघडली जाते आणी कशाचा कशाला संबंध नसलेल्या आठवणी फसफसुन वर येतात. आज महाराष्ट्र टाईम्स च्या site वर सुनीताबाई देशपांड्यांच्या निधनाची बातमी सापडली आणी पु.ल.-सुनीताबाई, त्यांची पुस्तकं, नाटकं, माझे शाळा-कॉलेजातले दिवस अशी फरफट निघाली.
१२ जुन २००० ला पु.ल. गेले. ज्यांच्या पुस्तकांनी मराठी वाचनाची गोडी लावली, निखळ निर्विष विनोद म्हणजे काय ते शिकवल, 'रसिकता' या शब्दाचा अर्थ जगुन दाखवला अश्या लेखकाला एकदा तरी प्रत्यक्ष बघाव अशी इच्छा होती. दुर्दैवानी ती पुर्ण झाली नाही. पु.ल.च्या पुस्तकांनी जे विश्व उभ केल त्याच्या जवळपास विरुध्द टोकाच लिखाण सुनीताबाईंनी केल.अवघी ४-५ पुस्तक लिहुन, पु.ल. सारख्या लेखकोत्तमाच्या छायेत राहुन, मराठी साहित्यात स्वतःच एक स्थान निर्माण करणार्या त्या लेखिका होत्या. त्यांच्या स्वभावासारखीच त्यांची सडेतोड आणी निर्भिड लेखणी, मराठी कवितांवरच निरातिशय प्रेम, गांधीवादी विचार जगुन दाखवण्याची धडपड, जी. ए. सारख्या लेखकांच्या लेखकाशी असलेली अमुल्य मैत्री, संगीत नाटक साहित्य सिनेमातील दिग्गजांशी जमलेला स्नेह आणी पु.ल.ना त्यांनी दिलेली समर्थ साथ हे सगळ पाहिल की अचंबित व्हायला होत. मागच्या वर्षी नोव्हेंबर मधे त्या गेल्या आणी महाराष्ट्राच्या सांस्कॄतीक पटावरच्या एका फार मोठ्या आणी कधिही विस्मॄतीत जाउ न शकणार्या पर्वावर पडदा पडला. पु.ल.च्या त्यांच्याकडे असलेल्या नाटकांचे हक्क त्यांनी सर्वांसाठी खुले केले. आता या नाटकांच्या प्रयोगासाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागणार नाही. तसेच त्यांच्या सर्व पुस्तकांचे आणी त्यांच्याकडे असलेल्या पु.ल.च्या पुस्तकांचे हक्क त्यांनी पुण्याच्या आयुका या संस्थेला दिले. पु.ल.देशपांडे फाउंडेशनच्या माध्यमातुन अलिप्तपणे या दोघांनी अनेक संस्थांना लाखांची मदत केली. समाजाकडुन जे मिळाल ते सर्वच्या सर्व समाजाला परत देउन स्वतःसाठी एक कपर्दिकही न ठेवता हे जोडप निघुन गेल. एका सुंदर आणी आदर्श सहजीवनाची सांगता झाली.
गेल्या काही वर्षात सुनीताबाई, विंदा, ग.प्र.प्रधान या सारखी काही फार मोठी व्यक्तीमत्व आपल्यातुन निघुन गेली. गांधीवादी, समाजवादी विचारसरणीकडे झुकलेली, मुल्य तत्वांना धरुन जगलेली, सामाजिक भान असलेली...आज आजुबाजुला कोसळणारी मुल्यव्यवस्था बघितल्यावर त्यांच जाणं प्रकर्षानी जाणवत. ते मोठे साहित्यिक होते यात वादच नाही. पण त्यांनी जगुन दाखवलेली विचारसरणीही तितकिच महत्वाची होती. होती ? का आजही आहे ? काळाच्या संदर्भात मुल्यांचे अर्थ बदलतात का ? का आजुबाजुच्या परिस्थितीच्या संदर्भात आपणच ते लावायचे असतात ? माहित नाही.

Friday, January 29, 2010

न्हावी

साधारण २-३ वर्षांपुर्वी कधितरी अमेरिकेत आलो असेन. (ok. ३००-४०० वर्षांपुर्वी शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा नेमका कोणत्या दिवशी काढला एवढी जुनी आणी अवघड तारीख नाहीये ती. जिज्ञासुंसाठी ऑगस्ट २००७ ला आलो.) या आधीच्या आमच्या सर्व शिक्षित पिढ्यांपैकी शिकण्यासाठी पुण्याबाहेर पाऊल कुणीही टाकल नव्हत. त्यामुळे यायच्या आधी प्रश्नच प्रश्न डोक्यात होते. MS कशाशी खातात ? 'course register' करायचे म्हणजे नेमक काय करायच ? Funding नावाची वस्तु कुठे मिळते ? ( यासाठी भिक्षेकर्याच सोंग घेऊन दारोदार भटकाव लागत हे नंतर कळल.) आणी हे सगळ गरज पडली तर English मधे लोकांना कस विचारायच ? यासारखे प्रश्नासुर समोर उभे होते. अशा अभुतपुर्व गोंधळात पहिली semester सुरु झाली. त्यातुन 'भिक्षेची झोळी' रिकामीच असल्यामुळे university च्या kitchen मधे कामाला सुरवात केली होती. यात ३-४ महिने निघुन गेले. एका दिवशी सकाळी आंघोळीनंतर भांग पाडताना 'आपले केस वाढले आहेत' याचा साक्षात्कार झाला. घरी जरा केस वाढले की 'अरे केस कापुन ये आता तरी ...' असा आरडाओरडा आई-आजी सुरु करायच्या.इथे ती सोय नव्हती. म्हणुन नाईलाजाने येण्यार्या शनिवार रविवारी केस कापावेत अस ठरवल. College ला जाताना घराच्या कोपर्यावरच एक सलून सारख वाटणार दुकानही लक्षात होत.
मग शनिवारी सकाळी ९-१० च्या सुमारास अर्धवट झोपेत पायात चपला चढवुन त्या दुकानात जाऊन बसलो.समोर receptionist होती. पण अजुनही झोपेचा अंमल कायम असल्यामुळे ती receptionist, आजुबाजुची चकाचक डोक्यात उतरत नव्हती.आपला नंबर आला की बोलावतील या आशेवर बसुन होतो. आजुबाजुला थोडीफार गडबड दिसत होती.थोड्या वेळानी एक मध्यमवर्गीय बाई आत शिरली आणी थेट receptionist कडे गेली. तिथे त्यांची थोडी गुफ्तगु झाल्यावर तिने त्या बाईंना सन्मानान आत नेऊन बसवल. ही बाई रांग मोडुन कशी घुसली ? हा संतापजनक प्रश्न डोक्यात येत जात असतानाच त्या receptionist नी माझ्याकडे येऊन 'Do you have appointment ? ' अस गोड आवाजात विचारल. या प्रश्नानी डोळ्यावरची झोप खाडकन उतरली आणी आपण सलुन सोडुन dentist च्या दवाखान्यात तर घुसलो नाही हे तपासण्यासाठी मी आजुबाजुला नजर फिरवली.पण ते सलुनच होत. चारी भिंतिंवर वेगवेगळ्या brands ची hair products, posters आणी doctor सारखा एप्रन घालुन केशकर्तन करणार्या बहुतांशी बायका आणी तुरळक पुरुष !! . 'Appointment नाही' अस मी तिला सांगताच, आम्ही फक्त appointment नीच haircut करतो आणी पुढचे ३-४ दिवस भरलेले आहेत ही कुवार्ता दिली. सोन्यासारखा शनिवार असल्यानी डोक्याला फारसा त्रास न देता 'मी नंतर फोन करुन appointment घेईन ' अस सांगुन बाहेर पडलो.
काही 'अनुभवी' लोकांना विचारल्यावर, 'इथे अशीच पध्दत आहे' आणी appointment शिवाय केशकर्तन कमी ठिकाणी असत अस कळल्यावर, ' कशाला या भानगडीत पडा ?, सरळ केस वाढवुन ponytail बांधुया असा विचार मनात आला. पुढच्याच फोनवर घरी आईला हे सांगताच आमच्या मातेनी , 'तु तश्या अवस्थेत परत ये...मी तुला घरात काय building मधेही घेणार नाही' असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे appointment घेण आल. आता या आधी कधी doctor चीही appointment घेतली नव्हती. लहानपणापासुन काही दुखल्या खुपल्यास family डॉक्टरांसमोर जाऊन उभ रहायच. त्यांनी दिलेल लाल औषध ( थोड मोठ झाल्यावर पांढर्या गोळ्या ) घेतल्या की जगातले सर्व रोग बरे होतात हा विश्वास होता. त्यामुळे १० वी च्या इंग्रजीच्या डाके सरांच नाव घेऊन फोन लावला. डोक करायची appointment पाहिजे अस सांगितल्यावर 'कोणाची देऊ ? Anybody favorite ? याआधी आमच्या इथे कोणाकडे appointment घेतली होतीस ?' हे प्रकरण इतक complicated असेल याची खरच कल्पना नव्हती. मग 'माझ कोणी favorite नाही. मी तुमच्या इथे पहिल्यांदाच केस कापुन घेतो आहे.' हे तिला समजावुन दिल. ते ऐकल्यावर 'ok. मग मी तुला Lisa ची appointment देते. वेळेवर ये. उशीर झाला तर आम्ही appointment cancel करतो' अशी धमकीही वर दिली.
ठरलेल्या दिवशी दिलेल्या वेळेच्या आधीच तिथे जाऊन बसलो. आधीचा customer गेल्यावर receptionist नी मला Lisa च्या खुर्चीकडे पाठवल. तिथे गेल्यावर त्या Lisa नी तोंडभरुन हास्य केल. आमची साता जन्माची ओळख आहे आणी आम्ही लहानपणी बालवाडीत फुगडी खेळायचो अश्या थाटात सुरवात केली. "Welcome. How are you today ? Let me take your coat. Please have a seat..."
या अनपेक्षित स्वागतान गांगरुन जाऊन मी त्या खुर्चीवर अवघडुन बसलो. 'ह्या सगळ्या स्वागताचे किति पडतील ?' हा प्रश्न डोक्यात वळवळत होताच. सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर झाल्यावर माझ्याकडे बघत तिनी विचारल
"So, what you want to do today ? "
..ऑं ?? ( उटण लावुन आंघोळ !!! जमेल ?? )
न्हाव्याकडे केस कापणे आणी दाढी ही दोनच काम होतात अशी माझी समजुत होती.
आता हिला नेमक काय सांगायच अश्या संभ्रमावस्थेत काही सेकंद गेल्यावर ' मला फक्त केस कापायचे आहेत. बस्स.' हे समजावुन सांगितल. ते कळल्यावर प्रयोगशाळेत फिरत्या टेबलावर प्रयोगासाठी ठेवलेल्या उंदराला फिरवाव तशी ती खुर्ची फिरवत माझ्या डोक्याकडे बघत पुढचा प्रश्न केला,
"किती इंच केस ठेवायचेत तुला ?"
खर सांगतो, ती ' तु देशस्थ ॠग्वेदी ब्राम्हण दिसतोस ' म्हणाली असती तरी मी जितका दचकलो नसतो तितका या प्रश्नानी दचकलो.
किती इंच केस ठेवायचेत ? या प्रश्नाच उत्तर कस शोधायच हे आजतागायत मला उमगलेल नाही. अंदाजच करायचा झाला तर साधारणपणे अशी procedure असावी. आधी घरी फुटपट्टनी आपले वाढलेले केस मोजायचे. मग आरश्यासमोर ध्यान लावुन किती इंचाचे केस आपल्या रुपड्याला शोभुन दिसतील यावर गहन विचार करायचा. तो आकडा ठरला की इयता २ मधल गणित पणाला लावुन पहिल्या अंकातुन दुसरा अंक वजा करायचा.मग तो आकडा आपल्या वहीत टिपुन घेउन खुर्चीवर बसल्यावर तिच्या तोंडावर फेकायचा. या खुर्चीवर पोचे पर्यंत कराव्या लागलेल्या धकाधकीनी माझ डोक आधीच शिणल होत. त्यामुळे 'बाईग, तुला माझ्या डोक्याच काय करायचय ते कर, फक्त माझ्या डोक्याला त्रास देऊ नकोस' अस सांगाव असा एक विचार मनात आला.पण मग नंतर होण्यार्या परिणामांनाही सामोर जाव लागल असत. म्हणुन 'medium करा. side नी कमी.' या भारतीय न्हाव्याला देण्यात येण्यार्या आदेशाच ईंग्रजीत रुपांतर करत करत, इंच इंच लढवत शेवटी ते केशकर्तन शेवटाला नेल. बोटाच्या पेरांनी लांबी मोजत, अर्धा मिलिमिटर जरी एकडेतिकडे झाल तरी जणु तिला अफगाणिस्तानात तालिबान्यांचे केस कापायला पाठवल जाईल अश्या भितीनी घाबरत विचारत तिनी माझ डोक भादरल. या सगळ्या प्रक्रियेच output आरशात बघुन आणि भारतातल्या पंचवार्षिक केशकर्तनाइतक बिल चुकत करुन, 'come again' च्या डागण्या सोसत तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडलो.
घराकडे परत चालत येताना आमचा शंकर न्हावी डोळ्यासमोर उभा राहिला. पत्र्यामरुतीच्या समोर त्याच पिढीजात सलुन आहे. माझ्या आजोबांच, नंतर माझ्या वडिलांच आणि माझ अश्या तीन पिढ्यांची डोकी त्याच्या हाताखालुन गेली. त्याला किंवा आपल्या कुठल्याच न्हाव्याला हे इंचाबिंचाचे प्रश्न कधी पडलेच नाहीत. लहानपणी केस वाढल्यावर आजोबा हाताला धरुन त्याच्यासमोर बसवायचे आणी ' एकदम कमी कर रे...म्हणजे २ महिने बघायला नको' असा आदेश द्यायचे. नंतर नंतर तर त्याला काही सांगावच लागायच नाही. खुर्चीवर बसल्यावर काही न विचारता तो कात्री आणी तोंडाचा पट्टा सुरु करायचा ते थेट केस कापुन संपेपर्यंत.
आधीच्या अनुभवानी पोळल्यामुळे मी पुढच्यावेळी दुसर्या सलुन मधे जायच ठरवल. एक दिवस उशीरा संध्याकाळची appointment घेऊन दुसर्या बाई समोर बसलो. आधीच्या ठेचेन आलेल चमचाभर शहाणपण वापरुन इंचाचे आकडे कुशलतेने ( माझ्या मते...) पेरत तिला समजावुन सांगितल. आता मागच्या प्रमाणे मोजत, घाबरत, विचारत गाडी चालणार आणी आपण हवे तसे केस कापुन घेऊ या आनंदात मी होतो. पण ते ऐकल्या ऐकल्या तिनी मला काहीही न विचारता आणी बोलायची एकही संधी न देता कात्री, कंगवा आणी विविध clippers वापरुन माझ्या डोक्याची कापणी केली आणी आरसा समोर धरला. ( नंतर वट्ट डोलर्स मोजुन घेतना 'अरे, फारच चटकन झाला की तुझा haircut, आता मला लवकर सलुन बंद करता येईल' हे ऐकवल..)

पण आता मी निर्ढावलो आहे. घरचच सलुन आणी घरचाच न्हावी असल्याच्या आत्मविश्वासात त्या खर्चीवर बसुन इंचाच्या गप्पा मारत अपेक्षित haircut करुन घेण्याइतक ईंग्रजी सुधारल आहे. नेहेमिच्या सलुन मधला haircut करणारा Peter ओळखीचा झाला आहे.शेवटी मी एकदा त्याला अनेक दिवस पोटात डचमळणारा अस्सल घाटी प्रश्न विचारुन टाकला. 'किती सुट्तात हो महिन्याचे ??' . मिळालेल्या आकड्याच्या धक्क्यातुन मी अजुनही सावरतो आहे आणी याअमेरिकन लोकांची software लिहिण्यापेक्षा त्यांची पाण्यानी वा बिनपाण्यानी करण जास्त फायदेशीर आहे या निष्कर्षाला पोचलो आहे !!.